चंद्रपूर - घुग्घुस येथे वास्तव्यास असलेले जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. या कुटुंबातील तीन सदस्य संक्रमित झाले आहे. एका लग्नसमारंभात सामील झाल्याने संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आले होते.
जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असलेले काही नेते घुग्घुस येथील आहेत. हे नेते मागील काही महिन्यांत कोरोनाच्या सर्व नियमांना तोडून आपल्या कार्यकर्त्यांच्या जंगी पार्टीत सामील झाले होते. यामुळे समाजमनात हे नेते टीकेचे धनी झाले होते. मास्क न घालता, फिजीकल डिस्टन्सिंग न ठेवता शेकडो लोकांच्या घोळक्यात ते सामील झाले होते. ह्या बेजबाबदारपणामुळं अनेकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. अखेर यापैकी एका नेत्याच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह निघाले. यावरून तरी घुग्घुसच्या नागरिकांनी आणि नेत्यांनीही धडा घेण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना कोविड-19 चा संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेले घुग्घुस येथील श्रीराम वॉर्ड नं. 2 येथे राहणारे भाजपा जिल्हास्तरीय नेते यांच्या 65 वर्षीय मातोश्री या संक्रमित झाल्या आहे. भाजप नेते यांच्या आई, सुभाषनगर येथील त्यांची बहीण आज भाची 5 ऑगस्टला चंद्रपूर - घुग्घुस मार्गावरील अहमद लॉन येथे झालेल्या लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या ठिकाणी घुग्घुस येथील संक्रमित खासगी डॉक्टर व त्यांच्या कोरोनाग्रस्त पत्नी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. या कार्यक्रमात घुग्घुस येथील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि राजकारणातले मोठे प्रस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात नियमानुसार 50 लोकच उपस्थित असल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी येथे देखील त्यापेक्षा जास्त नागरिक उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नेत्याच्या घराचा परिसर आता सील करण्यात आला. तसेच हे कुटुंब एका खासगी हॉटेलमध्ये क्वारन्टाईन झाले आहे. त्यातील काही सदस्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असली तरी त्यांचे स्वाबही घेण्यात येणार आहेत. घुग्घुस हा कोरोनाचा नवीन हॉट स्पॉट ठरतो आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे हे एकूणच चित्र चिंतेत भर टाकणारे आहे.