चंद्रपूर - मागील चार वर्षांत जप्त केलेल्या तब्बल दोन कोटींच्या दारूसाठ्यावर आज रोलर फिरवण्यात आला. जिल्ह्यातील रामनगर आणि शहर पोलीस ठाण्यांतर्गत पकडला गेलेला हा दारूसाठा आहे. यावरून दारुबंदीच्या या जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते, याचा अंदाज येतो.
1 एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली. तत्पूर्वी चंद्रपूर जिल्हा हा राज्यातून सर्वाधिक महसूल मिळवणारा दुसरा जिल्हा होता. यावरुनच येथे दारूची किती मागणी होती, हे लक्षात येते. त्यामुळेच मागणीप्रमाणे जिल्ह्यात दारूही येऊ लागली. ती पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांपासून वाचण्यासाठी दारुतस्कर वेगवेगळ्या युक्त्या वापरू लागले. पोलिसांच्या अनेक कारवाईतुन हे समोर आले.
2015 पासून 2019 पर्यंत पकडण्यात आलेल्या दारूसाठ्याची विल्हेवाट आज लावण्यात आली. चंद्रपूर शहरातील रामनगर आणि शहर पोलीस या दोन पोलीस स्टेशनकडून जप्त केलेला तब्बल 2 कोटी 12 लाखांचा दारूसाठा आज न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. पडोली परिसरात या दारूसाठ्यावर रोलर चालविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. यावेळी अबकारी विभागाचे अधिकारी रामनगर आणि शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.