चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जूना पोडसा गावात एका शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाचा चमु घटनास्थळी दाखल झाला आहे.
मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जूना पोडसा येथील चनकापुरे नामक शेतकऱ्याचा शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे काही दिवसापुर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या वाघाच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
वाघांची संख्या झपाट्याने घटत असल्याने एका-एका वाघांचे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. पण, त्याच वेळी अशा दुर्दैवीपणे वाघांचा जीव जात असल्याने वन्यप्राणी संरक्षकांमध्ये चिंता व्यक्त होते आहे.