चंद्रपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) (Chandrapur NCP district president) राजेंद्र वैद्य (Rajendra Vaidya) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसला आहे. ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष (Chandrapur NCP women president) बेबीताई उईके (Baby Uike) यांनीही पक्षाकडे आपला राजीनामा पाठविला आहे. या दोन राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादीत राजीनामा सत्र बघायला मिळेल, अशी चर्चा पक्षाअंतंर्गत वर्तुळात केली जात आहे.
उईके यांची जिल्ह्यात चांगली पकड: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीमध्ये विश्वासात घेतले नाही म्हणून राजेंद्र वैद्य यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. वैद्य यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बेबीताई उईके यांनीही राजीनामा दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून उईके या पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना एका जाहीर सभेतील उईके यांच्या भाषणाने शरद पवार प्रभावित झाले होते. त्यानंतर पवार यांनी उईके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. महिला वर्गासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उईके यांची चांगली पकड आहे. मात्र आता त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. राजेंद्र वैद्य यांनीही तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या दोन राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेबीताई उईके या सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतांना त्यानी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पक्षाने अजूनही दोघांचे राजीनामे मंजूर केलेले नाही.
नाराजी नाही, नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी: याबाबत बेबीताई उईके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण नाराज नसून नव्या कार्यकर्त्यांना आता जबाबदारी द्यावी, त्यांना संधी मिळावी या उद्देशातून हा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांपासून पक्षश्रेष्ठीने विश्वास दाखवत सातत्याने मोठे पद दिले मात्र आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.