चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुलातील ( Chandrapur district sports complex ) धावपट्टीचे नुकतेच लोकार्पण झाले. मात्र याचा वापर करणाऱ्या खेळाडू आणि सामान्य नागरिकांसाठी तीनशे ते पाचशे रुपये शुल्क लावण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा संकुलाने घेतल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. यावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असतानाच आज हा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजला. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी या अन्यायपूर्ण निर्णायाच्या विरोधात विधानसभेत ( winter session ) प्रश्न उपस्थित केला. यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी हा शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच याबाबत क्रीडा मंत्री महाजन ( Sports Minister Girish Mahajan ) यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना तात्काळ नागपूरात बोलवले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
क्रीडा अधिकाऱ्यांना सुनावले : जिल्हा क्रीडा संकुलात धावपट्टी म्हणून सिंथेटिक ट्रॅक तयार केला. ही अत्याधुनिक पद्धतीची धावपट्टी असून याच्या लोकार्पण प्रासंगिक चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला. आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण न देताच त्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव छापले. यामुळे संतापलेल्या जोरगेवारांनी यावर निषेध नोंदवत बहिष्कार टाकला. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तीन तास लोटूनही कार्यक्रमस्थळी न पोचल्याने संतप्त झालेले खासदार बाळू धानोरकर यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले आणि अधीकारी, जिल्हाधिकारी यांना खडसावत निघून गेले.
शुल्क वसूल करण्यामुळे वाद : त्यातच भाजपने याचे श्रेय घेत वेगळ्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली हे वेगळेच. यात राजकीय वातावरण तापले असताना पुन्हा एक नवाच वाद निर्माण झाला. येथे येणारे खेळाडू आणि सामान्य नागरिकांसाठी शुल्क वसूल करण्याचा फलक जिल्हा क्रीडा संकुल परिसरात लावण्यात आला आणि पून्हा नव्या वादाला तोंड फुटले. सामान्य नागरिकांना प्रति महिना 500 तर खेळाडूंना 300 रुपये महिना देणे सक्तीचे केले. ही बाब समोर येताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. त्यामुळे जिल्हा क्रीडा प्रशासनाने घुमजाव करत निर्णय अद्याव लागू केला नसून याबाबत सामान्य नागरिक, खेळाडूंकडून अभिप्राय मागण्यात येत असून यानंतर निर्णय घेण्याचे सांगितले. याच दरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा आज विधानसभेत मांडला.
शुल्कावर स्थगिती 10 जानेवारीपर्यंत : सिंथेटिक ट्रॅक फुटबॉल ग्राउंड वापराची नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये आकारण्यात आलेल्या फी बाबत किंवा नियमावलीतील नियमाबाबत काही हरकती आक्षेप व सूचना असल्यास खेळाडू नागरिक क्रीडाप्रेमी यांनी लेखी स्वरूपात दिनांक 10 जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे द्याव्यात. आलेल्या सूचना जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ठेवून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत कोणतीही फी तूर्त आकारण्यात येणार नाही अशी माहिती
जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड यांच्याकडून देण्यात आली आहे.