चंद्रपूर- जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरलेल्या डॉ.कुणाल खेमणार यांची अचानक बदली करण्यात आली आहे. खेमणार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत कुशलपणे हाताळण्यात येत होती. ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू न झालेला राज्यातील एकमेव जिल्हा म्हणून चंद्रपूरची दखल घेण्यात आलेली. विशेष म्हणजे जिल्ह्यात आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 03 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय अशावेळी त्यांच्या नेतृत्वाची जिल्ह्याला खऱ्या अर्थाने गरज असताना खेमणार यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची भावना नागरिकामध्ये आहे. खेमणार यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यांची बदली स्थानिक राजकारण्यांच्या दबावातून करण्यात आल्याचा आरोप समाजमाध्यमांमवर होत आहे.
डॉ. कुणाल खेमणार हे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासूनच त्यांनी एक कर्तव्यदक्ष, समजूतदार अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती. कोरोनाच्या काळात त्यांची ही प्रतिमा आणखीनच उजळून निघाली. कारण, खेमणार हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा सर्वात जास्त लाभ चंद्रपूर जिल्ह्याला झाला. म्हणूनच जेव्हा संपूर्ण राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत होती तेव्हा मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
राज्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू न झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत होती. 1 ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातही तो रुग्ण बाहेरून आलेला होता, जेव्हा आला तेव्हा त्याची स्थिती अत्यंत नाजूक होती. खेमणार यांच्या उत्तम नियोजनाचे राज्यभरात कौतुक करण्यात आले. चंद्रपूरच्या आरोग्य यंत्रणेचे हे यश केवळ योगायोग नव्हे तर यासाठी अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध केलेली आखणी कारणीभूत आहे. ज्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. कारण जिल्ह्यातील प्रत्येक कोरोनाच्या रुग्णावर एकाच छताखाली उपचार व्हावे, ही संकल्पना त्यांचीच होती. म्हणून रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकले. राज्यात अशाप्रकारचा एकमेव आणि आदर्श प्रयोग होता.
चंद्रपूरमध्ये मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे चित्र चिंताजनक आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी डॉ. कुणाल खेमणार हेच जिल्हाधिकारी हवे होते, अशी नागरिकांची भावना आहे. कारण, कोरोना संकटाच्या दरम्यान त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना डॉ. खेमनार यांची तडकाफडकी बदली करणे हे कितपत योग्य आहे?, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांनी केला आहे. खेमणार यांची बदली नंतर केली असती तर समजण्यासारखे होते. मात्र, खेमणार यांच्या बदलीमुळे चंद्रपूरच्या जनतेच्या आरोग्याला हरताळ फासल्याची भावना जनतेमध्ये आहे. समाजमाध्यमावर खेमणार यांची बदली म्हणजे राजकिय षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कोरोना संकटाच्या काळात चंद्रपूर जिल्हा सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झालेल्या खेमणार यांच्या बदलीमुळे सामान्य नागरिक नक्कीच दुखावले असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीच्या विरोधात लोक उभे ठाकतात, असे सुख वाट्याला येणारे डॉ. खेमणार जिल्ह्यातील हे पहिलेच जिल्हाधिकारी आहेत, अशी भावना व्यक्त केली जातेय.