चिमूर (चंद्रपूर ) - चिमूर तालुक्यात सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये आंबोली ग्रामपंचायतीत प्रस्तापितांना धक्का देऊन पदवीधर पॅनल स्थापन करून युवकांनी ग्राम पंचायत काबीज केली. सरपंच-उपसरपंचासह सदस्यही पदवीधर असून ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, याची गावातील पदवीधर तरुण-तरुणींना माहिती व्हावी, यासाठी "एका दिवसाचा सरपंच उपक्रम" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे गावातील तरुणांना एक दिवसाचा सरंपच बनविण्याचा उपक्रम महाराष्ट्रात कुठेही झाला नाही.
पदवीधर विद्यार्थी बनले गाव पुढारी -
ग्रामविकासाकरीता महत्वाची संस्था म्हणजे ग्रामपंचायत. यात प्रस्तापित गाव पुढाऱ्यांकडून तरुणांना संधी नाकारली जाते. आंबोली गावातील उच्चशिक्षीत तरुणांनाही याचा अनुभव आला. ग्राम विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविण्याकरीता ग्राम पंचायतीची सत्ताच आपल्या हातात आल्यास हे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जानेवारी २०२१ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत पदवीधर पॅनलच्या माध्यमातून ९ सदस्य असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत तरुण उतरले. यात पॅनलचा विजय होऊन पदवीधर तरुणांनी सत्ता काबीज करीत गाव पुढाऱ्यांचा मान मिळविला.
गावातील तरुणांना नामी संधी -
जेष्ठ तथा प्रस्तापित राजकारण्यांचा सत्तेचा मोह सुटत नाही. यामुळे गावातील तरुण-तरूणींना संधी मिळत नसल्याने घेतलेल्या शिक्षणाचा समाजाला, गावाला लाभ मिळत नाही. त्यामुळे गावातील तरुण- तरूणींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना सुध्दा ग्राम पंचायतीचा कारभार समजावा. सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे कर्तव्य व जबाबदारी समजावी या करीता गावातीलच योग्य अशा पदवीधर युवक युवतींना एक दिवसाचा सरपंच म्हणून निवड करण्याचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला. यामुळे तरुणांच्या नेतृत्वगुण, त्यांच्या गाव विकासाच्या संकल्पना व नियोजन याचे प्रत्यक्ष सादरीकरणाची तरुण तरुणींना नामी संधी मिळेल.