चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बोगस बियाण्यांची एका वाहनातून तस्करी होत असल्याची माहिती विरुर पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी असलेले एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
विरुर पोलिसांना तालुक्यात बोगस कापूस बियाण्यांची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विरुर पोलीसांनी एक वाहन (टीएस ०८ युएच ३८९२) अडवून त्याची तपासणी केली असता त्यात एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले. याबात वाहनचालक भास्कर पेट्यारी, जंगी रेड्डी (हैदराबाद) यांना पोलिसांनी विचारणा केली. यावेळी, त्यांनी हे बियाणे श्रीनिवास मामेडपल्लीवार, आसिफाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील आनंद पेरगुरवार याचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी चालकासह बियाणे ताब्यात घेऊन कृषी विभागाकाकडे तपासणीसाठी पाठविले. कृषी विभागाच्या अहवालात हे बियाणे एचटीबीटी कंपनीचे असून त्यास शासनाची मान्यता नसल्याचे म्हटले आहे. या अहवालावरून आरोपीविरुद्ध विरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत १६ लाख २२ हजार रुपये किंमतीचे बियाणे, वाहन किंमत अंदाजे ५ लाख रुपये, असा एकूण २१ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी केली. पुढील तपास विरुर पोलीस करत आहेत.