चंद्रपूर - कुणी एखाद्याने भाजपच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा त्याच्यामागे लावणं ही आता फॅशन झाली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून मी राजकारणात आहे. मात्र यापूर्वी अशा सूडबुद्धीने कोणी कारवाई केल्याचं मी बघितलं, ऐकलं नाही. यापूर्वी ईडीचं नाव कुणाला माहिती नव्हतं. याचा वापर आता सर्रास केला जातो. भाजपने याचे आत्मचिंतन करायला हवं. ज्या सूडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर केला जातोय त्याचा उलटा परिणाम भाजपच्या विरोधात महाराष्ट्रात केला जाऊ शकतो. किंबहुना देशात याचे पडसाद उमटतील, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला दिला. ते महात्मा फुले समता परिषदेसाठी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
ईडी, सीबीआयच्या भरवशावर सरकार बनेल ह्या भ्रमात राहू नका -
ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहे म्हणून कुठलंही सरकार तुम्ही बनवू शकता या भ्रमात भाजपने राहू नये. अशा वृत्तीमुळे भाजपचे कार्यकर्ते देखील जवळ राहणार नाहीत. त्यांना सर्व दिसतं पण ते बोलू शकत नाहीत. मात्र, सर्वसामान्य जनतेला सर्व कळतं. राज्यातील सरकारला काम करू देण्याऐवजी निरर्थक अडथळा आणता. हे लोकांना न पटण्यासारखे आहे. एखाद्या सर्वसामान्य भगिनींच्या घरी देखील धाड टाकता. त्या लहानशा घरात सातसात दिवस आयकर विभागाचे 15-20 अधिकारी बसून चौकशी करायला लागले तर अशांनी करायचे काय? ज्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, त्यांची देखील चौकशी दोन-तीन दिवसात होते. हे सर्व दुर्दैवी आहे. चौकशी करायची ते नक्की करा. पण छळवणूक कशासाठी? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यावर 40 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तुरुंगवास भोगावा लागला. मला, माझ्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास भोगावा लागला. अखेर एक पैशाचा भ्रष्टाचार देखील सिद्ध होऊ शकला नाही.
हे ही वाचा - केंद्रीय तपास यंत्रणांची आता कीव यायला लागली - बाळासाहेब थोरात
..म्हणून मी आता केसांना डाय लावत नाही -
यापूर्वी छगन भुजबळ हे आपल्या केसांना डाय करायचे. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी कधीच डाय लावली नाही, याचा खुलासा त्यांनी केला. यापूर्वी मी केसांना डाय लावत होतो. मात्र जेव्हा बाहेर आलो तेव्हा अनेकांनी मला आपले पांढरे केसच चांगले दिसतात असे सांगितले. मलाही ते पटलं. डायमध्ये केमिकल असते, शिवाय ते लावायला बराच वेळ लागतो. आता माझा वेळ वाचतो. त्यामुळे मी त्या फंदात पडत नाही. आता तर अशी फॅशन झाली आहे. असे ते म्हणाले.