चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध धंद्यांना ऊत आला आहे. कोळसा तस्करी, वाळूतस्करी, दारूतस्करी, गौण खनिज तस्करी जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. मात्र, एक अवैध व्यवसाय असाही आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान मांडून आहे तो म्हणजे सट्टापट्टी. जिल्ह्यातील सर्वात मोठे सट्टापट्टीचे केंद्र हे दुर्गापूर ठरले आहे. येथे एका छोट्याश्या हॉटेलमध्ये हा अवैध धंदा सुरू आहे. याची एक दिवसाची उलाढाल ही लाखांच्या घरात आहे. 'महाराज' नामक व्यक्ती ह्या अवैध धंद्याचा म्होरक्या असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दुर्गापूर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर हा अवैध धंदा सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दूरवरून येतात लोक
राज्यात सट्टापट्टीवर पैसे लावून जुगार खेळणे हा गुन्हा आहे. असे असताना देखील जिल्ह्यात ही सट्टापट्टी छुप्या पद्धतीने सुरू आहे. गडचांदूर, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा या ठिकाणी ही सट्टापट्टी सुरू आहे. मात्र, दुर्गापुरातील सट्टापट्टीचा अड्डा हा जिल्ह्यातील सर्वात मोठा अड्डा आहे. येथे जुगार लावण्यासाठी दूरवरून लोक येतात. तसेच बाजूलाच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वसाहत, वेकोली कोळसा खाणीची वसाहत असल्याने या अड्ड्यावर नेहमी सट्टा लावणाऱ्यांची रेलचेल असते. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापासून अवघ्या काही अंतरावर एक जुने हॉटेल आहे. दाखवण्यासाठी हॉटेल मात्र आत सट्टापट्टीचा व्यवसाय असा हा प्रपंच आहे.
पोलिसांचा आशीर्वाद?
मूळचा राजस्थान येथील एक व्यक्ती हा सर्व व्यवसाय करीत आहे. 'महाराज' म्हणून तो परिचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सक्रिय आहे मात्र अजूनही कुठल्याही पोलीस यंत्रणेने या अड्ड्यावर कारवाई केली नाही हे विशेष. इतका मोठा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. काही अधिकाऱ्यांचे याला पाठबळ आहे अशी चर्चा सध्या आहे. मात्र, आता पोलिस विभागात मोठे बदल झाले आहेत, अनेक नवे अधिकारी रुजू झाले आहे. त्यामुळे आता यावर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा चालतो अवैध धंदा
सट्टापट्टी आणि मटक्याचा मुख्य स्रोत हा मुंबई येथील कल्याण, राजधान आणि मिलन ह्या नावावर जुगार खेळला जातो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा वेगवेगळ्या वेळी याचा आकडा जाहीर केला जातो. त्यावर जुगार खेळण्यासाठी आकडे लावले जातात. ह्याची चिठ्ठी बनवून छुप्या पद्धतीने ती दुर्गापूर येथील सट्टा केंद्रावर आणून दिली जाते. या चिट्ठीत सर्व तपशील असतो. 10 रुपयांवर हजार रुपयांपर्यंतचे पैसे मिळतात या आमिषाने अनेक लोक येथे येऊन सट्टापट्टी खेळत आहे. ही गंभीर बाब असताना त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.