चंद्रपूर- औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाची ओळख आहे. दिवसागणिक विकसित होत चाललेल्या या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर आले आहे. कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्प वस्तीत अंधाराचे जाळे पसरले आहे. तब्बल ३५ वर्षांपासून वस्तीत साधी वीज पोहोचलेली नाही. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले. निवडणुकीवर बहिष्कार टाकला, उपोषणे केलीत. मात्र, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. अखेर प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी शनिवारला वीज वितरण कार्यालयला धडक दिली.
जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्पवासी मागील ३० ते ३५ वर्षापासून अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. वस्तीत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. पाणी, विज, रस्ते या सुविधांसाठी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. याप्रकरणी वस्तीतील लोकांकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. मात्र, आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीच आले नाही.
सन २००८ मध्ये सलग आठ महिने वस्तीतील नागरिकांनी साखळी उपोषण केले. निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकला. मात्र, कुंभकर्णासारखी झोप घेत असलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. बंगाली कॅम्प वस्तीतील अंगणवाडीत जवळपास १३५ मुले आहेत. पक्की इमारत नसल्याने बांबूचे ताटवे उभे करून बनविलेल्या झोपडीत बसून मुलांना अ,ब, क चे धडे गिरविले जात आहेत. बंगाली कॅम्पमध्ये अंदाजे ४०० ते ५०० नागरिक वस्ती करून आहेत. सुविधांचा अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या वस्तीत विजेची व्यवस्था व्हावी यासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली व उप-अभियंतांना निवेदन दिले. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख राहुल पांडव, कोरपना तालुका अध्यक्ष सतीश बिडकर,पंकज माणूसमारे,सुरज बार, सत्वशिला घुले, अनील मख, जयदेव मंडल, गणेश बनिक, विश्वनाथ पतंगे, जगन्नाथ, महालदार, शोभा मेश्राम, बनमाला बिस्वास, नमीता मंडल, ललीता सोरते यांच्यासह बंगाली कॅम्पवासी उपस्थित होते.
हेही वाचा- चंद्रपूर महानगरपालिका; महापौरपदी राखी कंचर्लावार तर उपमहापौरपदी राहुल पावडे