चंद्रपूर - खोट्या आरोपाखाली अटक करण्याची भीती दाखवून 10 हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. रमेश खाडे, असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो वरोरा पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
तक्रारकर्ता रुग्णवाहिका चालक आपल्या गाडीने चंद्रपूरवरून नागपूरला जात असताना वरोरा येथे अपघात केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी अडवले होते. त्यानंतर खाडे यांनी चालकाकडे पैशाची मागणी करून त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काल वरोरा येथील बोर्डा चौकात खाडे यांना 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु, फिर्यादीला या लाचखोर अधिकाऱ्याला खोट्या आरोपाखाली पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून आपली आपबीती सांगितली.
त्यानंतर लाचलुचपत विभागाने गुप्त पथक तयार करून घटनास्थळी सापळा रचला. यानंतर लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे याला 10 हजार रुपये रोख रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढालेसह अजय बागेसर, रविकुमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व चालक दाभाडे यांनी ही कारवाई पार पडली.