चंद्रपूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कर्मचारी सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान इखलाख कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला.
हेही वाचा - राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवा; शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आदेश
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारचे धोरण उदासीन आहे. सरकार विरोधी घोषणा देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध केला. थकीत मानधनातील फरकाची रक्कम त्वरीत देण्यात यावी, पंतप्रधानांनी ११ सप्टेंबर २०१८ ला घोषित केलेली मानधन वाढ लागू करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धी रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळावे, अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलचे रिचार्ज शासनानेच करून द्यावेत, सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे त्वरीत भरावी, मिनी अंगणवाडीला मदतनीस देण्यात यावी, नगर पालिका क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा जेष्ठतेनुसार मदतनीसांना नियुक्त करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प सहायक अधिकारी आशा कारदार यांना देण्यात आले. या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होत्या.