चंद्रपूर- जिल्ह्यातील राजुरा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जोगापूर जंगलात वाघाने एका जनावरे राखणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. यात गुराखी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. श्यामराव टेकाम असे जखमी गुराख्याचे नाव आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या जोगापूरच्या जंगलात श्यामराव टेकाम हे गुरे घेवून गेले होते. गुरे घेऊन परत येतांना त्यांचावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. उपचारासाठी श्यामराव यांना राजुरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, राजुरा शहरालगत असलेल्या रोपवाटीकेच्या मागे वाघ दिसून आला होता. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
तीन दिवसापूर्वी राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच आज परत वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, वनविभागाने गस्त वाढविल्याचे समजले आहे.
हेही वाचा- 'त्या' वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक; वृद्धापकाळ, भुकेने मृत्यू झाल्याचा अंदाज