चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चक्क लग्नाच्या निमंत्र पत्रिकेतून दारूची बाटली देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
चंद्रपूर शहरात 15 डिसेंबरला एक लग्नसमारंभ पार पडला. चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतून दारूची बाटली देण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये एक डबा दिसतो आहे. डब्यात लग्नाची पत्रिका आणि त्याखाली दारूची एक बाटली, पाण्याची बाटली आणि फरसानची पुडी दिसत आहे.
जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी
चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी आहे. तेव्हापासून दारू बाळगणे आणि विकणे गुन्हा आहे. मात्र, तरीही येथे सर्रासपणे दारू विकली जात आहे. दारू विक्रीसाठी विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढल्या जात आहेत. आता तर चक्क लग्नाच्या पत्रिकेतून दारूची तस्करी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही, मात्र पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.