चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथे दुर्मिळ अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा जातीचा साप आढळून आला. अनुवांशिक आजारामुळे या सापाचा रंग पिवळसर असतो. जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्थेतील सर्पमित्रांनी या सापाला पकडले. वनविभागात नोंदणी करून या सापाला वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.
राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील मडावी यांच्या घरी हा साप आढळून आला. त्यांनी जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्था राजूरा येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रांनी साप पकडण्यासाठी चंदनवाही गाठली. आढळून आलेला साप त्यांना वैशिष्ट्यपूर्ण वाटला. त्या सापाचे निरीक्षण केले असता तो अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा असल्याचे कळले.
अनुवांशिक आजाराच्या प्रकारामुळे या सापाचा रंग पिवळसर असतो. शिवाय डोळे गुलाबी असतात. त्वचेतील मेलानिनचे प्रमाण कमी असल्यामुळे या सापाला उष्णता सहन होत नाही. शिवाय उन्हामुळे दृष्टीही कमजोर होत असल्याची माहिती सर्पमित्र प्रवीण लांडे यांनी दिली. अशा प्रकारचे साप फार कमी प्रमाणात आढळतात. अनुवांशिक आजारातून अशा प्रकारचे साप जन्माला येतात. साधारण तीन फूट लांब असलेल्या या सापाला वन विभागामध्ये नोंदणी केल्यानंतर सर्पमित्रानी जंगलात सुखरुप सोडले. यावेळी जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लांडे, प्रविण लांडे, अमर पाचारे, संदीप आदे, शेखर खोके, प्रविण दुरबडे, सत्यपाल मडावी, गणपत मडावी, स्वप्नील बुट्टे उपस्थित होते.
हेही वाचा - दारूसह ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त; गोंडपिपरी पोलिसांची कारवाई