चंद्रपूर - राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणात पीडित मुलींना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज (गुरुवार) चिमूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुलनिवासी गोंडियन समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
चिमूर येथील गोंड मोहल्ला नेताजी वार्डातून मोर्चाला सुरूवात करत संबंधीत संस्था चालकाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील मुख्यमार्गाने मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ज्यात संबंधीत शाळा व संस्था कायम बंद करावी, संस्था चालकांना त्वरीत अटक करा, दोषी कर्मचाऱ्याना निलंबीत करून त्यांना मिळणारे पगार, पेन्शन व इतर सुविधा बंद कराव्या, मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, संस्थाचालकाकडून पीडित मुलींना उपचार खर्च १० लाख देण्याचे आदेश द्यावे, या प्रकरणात हयगय करणाऱ्या डॉक्टर व ठाणेदारावर अॅट्रासिटी अंतर्गत गून्हा नोंदवुन त्यांना तात्काळ निलंबित करावे, ५० लाखाची पीडितांना मदत इत्यादी १४ मागण्या निवेदणाद्वारे करण्यात आल्या आहेत.
शिष्ठ मंडळाचे निवेदन तहसीलदार संजय नागटिळक यांनी स्वीकारले. याप्रसंगी तिरु मडावी, नानाजी उईके, माधुरी वरखेडे, सरस्वती उईके, इंदरशहा मडावी, दागो वरखेडे इत्यादी आदीवासी समाज प्रमूख उपस्थित होते.