चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र ६ वर्षांनंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात दारूची दुकाने उघडी झाली. त्यामुळे, तळीरामांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. पहिल्याच दिवशी काही निवडक दारूच्या दुकानांवर मद्यपींची अक्षरशः झुंबड उडाली. त्यामुळे, दुकान मालकांची या गर्दीला सांभाळताना चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा - VIDEO: बंदी असतांनाही चंद्रपुरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन
मागील सहा वर्षांत 'इतके' गुन्हे दाखल
मागील सहा वर्षांत दारू तस्करी आणि विक्री करणाऱ्यांसंदर्भात 43 हजार 900 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 46 हजार 139 जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे, जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या संदर्भात मागणी पुढे येऊ लागली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत पुढाकार घेतला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर 27 मे २०२१ ला राज्याच्या मंत्रिमंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला.
दारूच्या दुकानांवर गर्दी
8 जूनला शासनाने निर्णय घेऊन याबाबत जाहीर केले. यानंतर 16 जूनपासून जिल्ह्यातील दारूविक्रीसंबंधी दुकाने, बार यांच्या परवान्यांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली. 2 जुलैपर्यंत एकूण 98 परवान्यांचे नुतनीकरण पार पडले. त्यानुसार आज या सर्व दुकानांना सुरू करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, नुतनीकरण झाल्यानंतर डीलरकडून माल मागविण्यासाठी इतर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. अनेक बार आणि दुकानमालकांची ही प्रक्रिया अडकल्यामुळे काही निवडकच बार जिल्ह्यात सुरू झाले. आज ही दुकाने सुरू होणार याबाबत मद्यपींना उत्सुकता होती. बार सुरू झाल्याची माहिती मिळताच मद्यपींची बारवर गर्दी झाली. गर्दीमुळे बार मालकांना पारसल सुविधाही राबवावी लागली.
हेही वाचा - चंद्रपूरमध्ये बिबट्याची दहशत; हल्ल्यात केल्या 12 बकऱ्या ठार