चंद्रपूर: पोलिसांना या प्रकरणाचा आरोपी कोण याचा कुठलाही थांबपत्ता लागत नव्हता. अखेर या घटनेच्या दीड महिन्यानंतर यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मनी असे या आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील आहे. त्याच्यावर तब्बल 50 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक घरफोड्याही केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर पोलीस पाळत ठेवून होते. अखेर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
काय आहे घटना? २३ मार्च रोजी मांगली या गावातील जगन्नाथ बाबा मंदिरात मृतक बाबुराव संभाजी खारकर (वय ८० वर्षे) व शेजारील शेतकरी (मृतक) मधुकर लटारी खुजे (वय ६५ वर्षे) हे झोपले होते. यावेळी चोरांनी मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने हत्यारासह प्रवेश करून दोघांचाही खून केला. यानंतर दानपेटीचे कुलूप तोडले आणि जवळपास दोन हजार रुपये चोरून नेले.
आरोपींचे पोलिसांना आव्हान: मांगली येथील मंदिरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे या गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान चंद्रपूर पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः याकडे लक्ष देत तपासाला मार्गदर्शन केले. तब्बल स्थानिक गुन्हे शाखेचे आठ विशेष पथक तयार करून अहोरात्र आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली; मात्र आरोपींचा नेमका उद्देश काय होता, हेच स्पष्ट होत नव्हते.
अनेक कयास निष्फळ: मंदिरातून दानपेटी चोरण्यात आली होती. मात्र मृतांच्या खिशामध्ये असलेल्या रोख रक्कमेला हात देखील लावण्यात आला नव्हता. त्यामुळे पैशासाठी हा खून झाला असावा का याबाबत देखील साशंकता होती. यासोबतच काही जमिनीचा वाद असून यामधून हत्या झाली का? याबाबत देखील पोलिसांनी सखोल चौकशी केली; मात्र कुठेही असा वाद असल्याचे समोर आले नाही. यादरम्यान पोलीस विभागाच्या सगळ्या यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या होत्या.
अखेर आरोपी सापडला: हत्याकांडाची पाळेमुळे चंद्रपूरात असल्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी केला. चंद्रपूरातील बंगाली कॅम्प परिसरात राहणारा मनी नामक व्यक्तीचा फोन घटनेच्या दिवशी या परिसरात ऍक्टिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस मनीवर पाळत ठेवून होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची कसून चौकशी केली. दरम्यान सहकाऱ्यासोबत मिळून आपणच ही हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले. चोरीच्या उद्देशाने आपण गेलो असता या दोन्ही वृद्धांना याचा सुगावा लागला. त्यामुळे आपण हा खून केला असल्याचा आरोपीने जबाब नोंदविला.
खून केल्यानंतर खाल्ली बिर्याणी: प्राप्त माहीतीनुसार, 23 मार्चच्या रात्री आरोपी मनी आणि त्याचे दोन सहकारी हे त्यांच्या कारने भंगार चोरण्यासाठी कर्नाटक एमटा कोळसा खाणीच्या परिसरात पोहोचले; मात्र त्यांच्या हातात काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी येथेच दारू ढोसली. यादरम्यान ते मांगली या गावाकडून जात असताना त्यांना एक मंदिर दिसले. या मंदिरामध्ये दानपेटी असून येथून आपण पैसे काढू शकतो असे आरोपींना वाटले. त्यांनी जगन्नाथ बाबा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दरवाज्याच्या आवाजाने मृतक झोपेतून उठले. ते आरडाओरडा करतील याचा विचार मनात येताच या तीन आरोपींनी मंदिरातील दोन्ही वृद्धांचा खून केला. यानंतर दानपेटीची चोरी केली. येथून पळून जाण्याआधी आरोपींनी सोबत आणलेल्या बिर्याणीवर ताव मारला. आरोपी मनी याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.