चंद्रपूर - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वारंवार दारू तस्करी आणि विक्रीची प्रकरणे घडली आहेत. त्याचप्रमाणे ही बंदी फोल ठरल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. शहरालगत असलेल्या दुर्गापूरच्या मुख्य मार्गावर चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्याचा सडा पडल्याचे दृश पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारू बंदी नावालाच असल्याचे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दुर्गापूर बाजाराला लागूनच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा परिसर आहे. यामध्ये एका भिंतीचे अंतर आहे. त्यामुळे मद्यपी बाजार परिसरात दारू पिऊन रिकाम्या बाटल्या भिंतीपलीकडे वीज कार्यालयाच्या आवारात फेकून देत होते. सध्या वीज केंद्राच्या परिसरात काम सुरू आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी आत असलेल्या दारूच्या बाटल्या बाहेर फेकून दिल्या आणि बाजूच्या मुख्य रस्त्यावर बाटल्यांचा सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात दारूबंदी करून चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यानच्या काळात तब्बल चाळीस कोटींच्यावर दारूसाठा जप्त करण्यात आला. तर पकडलेल्या आरोपींची संख्या हजारावर पोहोचली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील दारू तस्करीचा आणि विक्रीचा अंदाज येतोच. नागपूर, भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेश, हरियाणा येथून चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दारू येत आहे. काही महिन्यांपूर्वीच कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना अवैध दारूतस्करांनी वाहनाखाली चिरडले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. एकंदरीत दारूबंदीची स्थिती फोल असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत असून दारू आता गल्लीबोळात उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.