चंद्रपूर - गेल्या दोन महिन्यांपासून तेलंगाणात अडकलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेलंगाणातून 780 मजुरांना घेऊन धावलेली ट्रेन नागभीड रेल्वे स्थानकावर पोचली. यामध्ये चंद्रपूरसह गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील मजुरांचा समावेश आहे.
तेलंगाणातील रायनापांडु या रेल्वे स्टेशनवरुन 780 प्रवाशी नागभीडसाठी रवाना झाले. मिळालेल्या माहिती नुसार गडचिरोली जिल्ह्यातील 96, चंद्रपुर जिल्ह्यातील 617, गोंदिया जिल्ह्यातील 65 तर नागपुर जिल्ह्यातील 2 अशा चार जिल्ह्यातील एकुण ७८० प्रवाशांचा यामध्ये समावेश होता. ही श्रमिक स्पेशल ट्रेन तेलंगाणातील रायनापांडु या रेल्वे स्थानकावरून पहाटे 2 वाजताच्या सुमारे सुटली असून ती सकाळी साडेनऊच्या दरम्यान नागभीड रेल्वे स्टेशनवर पोहचली.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन तालुक्यानुसार एकुन महामंडाळाच्या 24 बस, खाजगी 8 बस तर 2 स्कुलबसची व्यवस्था करण्यात आली. यावेळी नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण, नागभीड तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीतम खंडाळे, आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, ठाणेदार दीपक गोतमारे, नागभीड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी मंगेश खेवले, ब्रम्हपुरी आगार प्रमुख सुरेश वासनिक, ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आलेल्या मजुरांचे स्वागत करण्यात आले. थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. नागभीड नगरपरिषदेच्यावतीने पूर्ण रेल्वे तथा संपूर्ण रेल्वे परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. प्रवाशांना आमदार बंटी भांगडिया यांच्यातर्फे जेवणाचे डबे, पाण्याची बाटली, सॅनिटाइझर, मास्क, बिस्कीट पाकीट देण्यात आले.