चंद्रपूर - लॉकडाऊनमुळे तळीरामांचे चांगलेच हाल होत आहेत. वाटेल त्या मार्गाने नशा करण्यासाठी तळीरामांची केविलवाणी धडपड सुरु आहे. अशाच तीन युवकांनी गांजा ओढण्यासाठी गावबंदी असलेल्या गावात मध्यरात्री पाय ठेवले. अनोळखी चेहरे दिसल्याने गावात आरडाओरड झाली. गावात घुसखोरी करणाऱ्या त्या युवकांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात घडली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत दारुसाठी वाटेल ती किंमत मोजायला तळीराम तयार आहेत. तळीरामांची तहान भागविण्यासाठी लॉकडाऊनमध्येही अवैध दारु विक्रेत्यांनी पाय पसरायला सुरुवात केली आहे. आता दारूच मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे नशेसाठी गांजा ओढण्याकडे तळीरामांनी धाव घेतली आहे.
नशेची लत भागवायला गोंडपिपरी शहरातील काही युवकांनी गावबंदी असलेल्या वढोली गावात मध्यरात्री चोरमार्गाने शिरकाव केला. गावातील काही महिलांनी या युवकांना पाहिले. चोर आले असे समजून आरडाओरड सुरु केली. आरडाओरड होताच युवकांनी गावाबाहेर असलेल्या शेतशिवाराच्या दिशेने धूम ठोकली.त्यांचा पाठलाग करत गावकरी ही धावत सूटले. हे तळीराम सापडताच गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला. आम्ही चोर नाही, गांजा ओढण्यासाठी आलो याची अशी कबुली युवकांनी दिली. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिसांना दिली. पोलिसांनी गाव गाठून त्या युवकांना ताब्यात घेतले