चंद्रपूर - ईमोजी म्हणजे केवळ एकही शब्द न लिहीता आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोचविण्याचे डिजिटल माध्यम. आपला आनंद, हसू, दुःख, खंत, राग, संशय अशा सर्व भावना याच ईमोजीतून व्यक्त करता येतात. खरं तर अवघ्या काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून याचा व्यापक पद्धतीने वापर सुरू झाला. त्याही पूर्वी इंटरनेट आल्यावर काही प्रमाणात याचा वापर होत होता. मात्र, ईमोजीसारख्या भावना व्यक्त करण्याचा शोध हा यापूर्वी म्हणजे सोळाव्या शतकात लागला असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? मात्र, हे खरं आहे. चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिराच्या सभोवती जे कोरीव काम करण्यात आले आहे, त्यात कीर्तीमुख या राक्षसाच्या तब्बल 180 भावमुद्रा कोरण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक मुद्रा ही एकापेक्षा वेगळी आहे.
16 व्या शतकात गोंडसाम्राज्याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले होते ज्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला होता. तेव्हाच्या काळात जेव्हा कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान नसताना इतकी परिपूर्ण, सुरेख आणि वैविध्यपूर्ण कला दगडावर कोरली कशी गेली हे अजूनही एक गूढ आहे.
अंचलेश्वर मंदिराची मुहूर्तमेढ आणि चंद्रपूरची निर्मिती - चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजांचे साम्राज्य होते. 15 व्या शतकात इथे राजा खांडक्या बल्लाडशाह यांचे राज्य होते. जे आत्ताचे बल्लारशाह हे शहर आहे. राजाला त्वचारोग असल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत होत्या ज्याला स्थानिक भाषेत खांडूक म्हणायचे, म्हणून राजाला खांडक्या असे नाव पडले. एकदा राजा शिकारीचा पाठलाग करत असताना चंद्रपूरजवळील झरपट नदीजवळ येऊन ठेपला. मात्र, उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदी पूर्णपणे आटली होती. राजाला तहान लागल्याने त्याचे सैनिक पाण्याच्या शोधात निघाले. काही शोध घेतल्यानंतर गाईच्या खुराच्या आकाराचा एक कुंड त्यांना दिसला. त्यात त्याने आपली तृष्णातृप्ती केली आणि आपले हातपाय देखील धुतले. या कुंडात सल्फरयुक्त पाणी असल्याची महिती आहे ज्यामुळे त्वचेच्या विकारावर त्याचा लाभ होतो. राजा रात्री परत गेल्यावर शांतपणे झोपला. अगदी गाढ झोप त्याला आली. दुसऱ्या दिवशी उठला त्याच्या बऱ्याच जखमा बऱ्या झाल्या होत्या. हे बघून त्याची पत्नी हिरातानी आश्चर्यचकित झाली. राणी त्वरित राजा आणि सोबत सैनिकांचा फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी गेली. यानंतर याच पाण्याचा उपयोग राजाला बरे करण्यासाठी व्हायला लागला. एक दिवशी राजाच्या स्वप्नात शंकराचे दर्शन झाले. पत्नी हिरातानी श्रद्धावान असल्याने तिने त्या ठिकाणी भगवान शंकराचे शिवमंदिर निर्माण करण्याचे कार्य केले. सोबतच परिसरात माता महाकाली हिची मूर्ती सापडल्याने बाजूला महाकाली मंदिर देखील तयार करण्यात आले. यानंतर याच परिसरात अनेक मंदिरांची स्थापना करण्यात आली. इथे रेलचेल होत असल्याने याच परिसरात एक नगरी वसवायचे ठरले त्यानुसार या नगरीला चांदा हे नाव देण्यात आले ज्याचे आज चंद्रपूर शहरात नाम रूपांतर झाले आहे.
यानंतर याच राजाचे वंशज म्हणून राजे वीरशहा यांची पत्नी राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या शेवटी गोंड राज्यावर भोसले साम्राज्याने कब्जा केला. त्यांच्या काळात देखील या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला ज्यात कलाकुसरीचा बारीक नमुना बघायला मिळतो.
काय आहे किर्तीमुखाची आख्यायिका - एकदा भगवान शंकर हे आपल्या तपस्येत लीन असताना एक तपस्येतुन शक्ती मिळविलेला व्यक्ती उन्माद करत असतो. तो शकरांची अवहेलना करत आवाहन देत असती. त्यामुळे त्यांची तपस्या भंग होते. यामुळे क्रोधीत झालेले महादेव त्याला धडा शिकविण्यासाठी किर्तीमुख या राक्षसाची निर्मिती करतात. त्याला मारण्याचा महादेव आदेश देतात. मात्र तो त्रास देणारा व्यक्ती महादेवाना क्षमायाचना करत आपल्या सोडून देण्यासाठी गयावया करायला लागतो. अखेर त्याला महादेव माफी देतात आणि तो तिथून निघून जातो. यानंतर महादेव पुन्हा तपश्चर्या करताना लीन होऊन जातात. मात्र, किर्तीमुख याची निर्मितीच खाण्यासाठी होते. तो महादेवाला वारंवार विचारतो की आता मी काय खाऊ. यामुळे संतापलेले महादेव स्वतःलाच खा असे सांगतात आणि पुन्हा तपश्चर्या करायला लागतात. जेव्हा महादेवाला हे लक्षात येते तेव्हा तेव्हा किर्तीमुख हा सर्व शरीर खाल्लेला असतो, केवळ त्याचे हात आणि डोकेच वाचलेले असते. यावेळी महादेव त्याला थांबवितात आणि त्याला वचन देतात की जेव्हा माझे मंदिर बांधले जाईल तिथे माझे दर्शन होण्यापूर्वी तुझे दर्शन करूनच भाविक मंदिरात येऊ शकतील. म्हणून कुठल्याही शिवमंदिराचा पाया किंवा घंटा वाजविन्याच्या ठिकाणी कीर्तीमुखाची प्रतिमा असते.