मुंबई - मी मुंबईची मुलगी आहे, याचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मुंबईची मराठी मुलगी असले तरी मराठी असल्याचे कार्ड निवडणुकीत वापरणार नाही, असे उत्तर मुंबई मतदारसंघाच्या काँग्रेसच्या (आघाडी) उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. पहिल्यादांच काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना मातोंडकर बोलत होत्या.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीची उमेदवारी हिंदी सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना जाहीर झाली आहे. त्या पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकशाहीत स्टार म्हणजे नागरिक आहेत. आमची लढाई ही प्रेमाची लढाई असल्याचे, त्यांनी मत व्यक्त केले. आमचे राजकारण हे द्रुष्ट असणार नाही. ते प्रेम व अहिंसेवर असणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मनात आचार-विचार आहेत, तेच निवडणुकीत बोलतील. प्रचंड उष्णतेत कोणाला वाटत असेल, मी वितळून जाईन तर, असे काही होणार नाही. यापुढे माझे कर्म निवडणुकीत बोलतील, असे सांगत कामाला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सूचित केले. उत्तर मुंबईची जागा 'बेस्ट' बनवणार असा दावाही उर्मिला यांनी केला आहे.