मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी ७ दिवसाची मुदतवाढ झाल्याचे परिपत्रक सरकारने काढले आहे. शासनाच्या वेबसाईटवर हे परिपत्रक प्रकाशित झाले असून यामध्ये प्रवेशासाठी ७ दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही परिपत्रकात स्पष्टपणे माहिती दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी ७ दिवस मुदत वाढवली असे काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. तरीही सरकारने मुदतवाढीची नोटीस काढली नव्हती. १ तासात नोटीस काढली नाही तर, वर्षा बंगला किवा मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता.
मराठा समाजातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरक्षणासाठी आजही आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्य सरकार तिढा सुटावा यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण प्रवेशाची ७ दिवसाची मुदत वाढवली, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाले होते.