मुंबई - कोलकाता येथील डॉक्टरांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद राज्यातही उमटणार आहेत. राज्यातील सरकारी व पालिका रुग्णालये सकाळी 8 ते 5 यावेळेत बंद ठेवणार असल्याचा निर्णय सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने घेतला आहे. तसेच यावेळी सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून धरणे आंदोलनात निषेध व्यक्त करणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही खासगी डॉक्टरांची संघटना देशभर निदर्शने करणार आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना सुरक्षा द्या, हल्ल्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी सेंट्रल मार्डने केली आहे. केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवली जाईल, अशी माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली.
पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा विस्कळित -
कोलकातामध्ये सरकारी एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी इंटर्न डॉक्टर आणि ज्यूनिअर डॉक्टरांना सोमवारी बेदम मारहाण केली होती. या घटनेत एका डॉक्टरांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. या हल्ल्याचा निषेध करत सरकारी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे.