मुंबई - शहरात काल सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मध्य रेल्वेची कुर्ला ते ठाणे हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये रात्री ११ पासून प्रवासी स्थानकामध्ये अडकले आहे.
रात्रीपासून ठाण्याच्या पुढील भागात जाणारे प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये खोळंबले आहेत. त्यांना बाहेर रस्ते वाहतुकीसाठी बस किंवा रिक्षासुद्धा भेटत नाही. जागोजागी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. स्थानकावर केवळ सखल भागांमध्ये काही रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे वाहतूक बाधित झाली आहे, एवढीच घोषणा सध्या प्रवाशांना ऐकायला मिळत आहे. सकाळी थोडावेळ थांबल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईमध्ये आज संततधार पावसाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी मुंबईची दैना उडाली आहे. हवामान खात्याने आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेल्या आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.