बुलडाणा - बुलडाणा तालुक्यातील हातेडी बु. येथे ग्रामपंचायतीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे मागील काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एक-एक महिना नळाला पाणी येत नाही. त्यामुळे उन्हाच्या चटक्यासोबतच महिलांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. अखेर संतप्त झालेल्या महिलांनी आज रिकामे हंडे घेऊन, सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
गावातील पाणीपुरवठा योजनेवर लाखोंचा खर्च
मागील काही महिन्यांपासून हातेडी बु. गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्वराज्य योजना व इतर काही योजनांच्या माध्यमातून पाईपलाईन करण्यात आली आहे. गावातील पाणीपुरवाठ योजनेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, मात्र तरीदेखील गावात पाणी येत नाही. दरम्यान आज संतप्त महिलांनी एकत्र येत, पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला कुलूप लावले. दरम्यान महिलांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे गावात खळबळ उडाली.
हेही वाचा - सचिन वाझेला एका रात्रीत व्हायचे होते सुपर कॉप; घरात मिळाल्या 65 बुलेट्स