बुलडाणा - एक अनामिक यंत्र अवकाशातून अचानक जमिनीवर पडल्याची घटना शुक्रवारी घडली. देऊळगाव शहरापासून दीड किलोमीटर असलेल्या कुंभारी गावात हा प्रकार आढळून आला. त्या यंत्रांमध्ये एक मोठ्या प्रकारचा फुगा होता. हे यंत्र पोलिसांनी जप्त केले आहे.
या यंत्राच्या खाली काही इलेक्ट्रॉनिक सामग्रीचे सर्किट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रथम भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेबाबत कुंभारी येथील नागरिकांनी देऊळगाव राजा येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पंचनामा करून पोलिसांनी हे यंत्र ताब्यात घेतले.
हेही वाचा - भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे नवे महापौर, उपमहापौरपदी कुसूम साहुंची वर्णी
कुंभारी शिवारातील बालू खांडेभराड यांचे शेत आहे. या शेतात हे यंत्र आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, तलाठी देशपांडे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन सदर यंत्राची तपासणी केली. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तलाठी देशपांडे यांना विचारणा केली असता हे यंत्र पर्जन्यमापक यंत्र असू शकते. हवामान खात्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे यंत्र बलून किंवा फुग्याद्वारे अवकाशात सोडण्यात येते. याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.