बुलडाणा - नागपूरच्या कामठी येथील आणि सध्या बुलडाण्यात अडकलेल्या तबलिगी जमातच्या 11 सदस्यांच्या कोरोना चाचणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या अहवालामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. या रुग्णाच्या एकाच स्वॅब नमुन्यातून कोरोनाचे दोन वेगवेगळे चाचणी अहवाल अकोला येथील लॅबमधून प्राप्त झाले. यातील एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह होता. तसेच ईटीव्ही भारतने सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर कोरोना तक्रार निवारण समितीच्या नोडल अधिकारी गौरी सावंत यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा... एकाच नमुन्यातून आलेल्या दोन वेगवेगळ्या कोरोना अहवालाची चौकशी करावी; बुलडाण्यात मागणी
बुलडाणा कोरोना प्रादुर्भाव रोखने तक्रार निवारण समितीच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी ५ मे रोजी एका पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना एकाच स्वॅब नमुन्यावरून आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. तसेच या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीअंती काय बाहेर पडणार, तसेच कोणावर कारवाई हे पहावे लागेल.
बुलडाण्यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या एकाच स्वॅबमधून दोन वेगवेगळे अहवाल आल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार अत्यंत गंभीर असून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. त्याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाजेर काझी आणि आझाद हिंद संघटनेचे अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी केली होती. या रुग्णाचे नमुने नागपूरला किंवा मुंबईला पाठवून तपासणी करण्यात यावी, असे सतीशचंद्र रोठे यांनी म्हटले होते. यानंतर आता नोडल अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने त्यांनी निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा... तबलिगी रुग्णाच्या एकाच स्वॅबचे दोन चाचणी अहवाल; एक कोरोना निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह