बुलडाणा - निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाने त्रस्त असलेल्या लोणार तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या दोन वेगवेगळ्या घटना आज उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवणी पिसा येथील केशव विश्वनाथ वाघ व सुलतानपूर येथील पुंजाजी बळीराम जाधव, असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा - बळीराजाच्या गळ्याभोवती फास आवळणारा अर्थसंकल्प,अर्थसंकल्पावर तुपकरांची जहरी टीका
अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेले
शिवणी पिसा येथील शेतकरी केशव विश्वनाथ वाघ (वय 53) यांणी गाव शिवारातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. वाघ यांचा मुख्य उद्योग शेती हाच असून यावरच त्यांच्या परिवाराचे वर्षाभराचे नियोजन होते. या वर्षी अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेल्याने लागवड खर्चही वसूल झाला नाही व लोणार तालुक्याला शासकीय मदतीचा लाभही मिळाला नसल्याने पुढील वर्षाभराचे नियोजन कसे करावे? या विवंचनेत वाघ असावेत, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. वाघ यांना 1 मुलगा, 1 मुलगी व पत्नी असा आप्त परिवार आहे.
आर्थिक विवंचनेला कटांळून आत्महत्या
सुलतानपूर येथील शेतकरी पुंजाजी बळीराम जाधव (वय 50) वर्ष यांनी सुलतानपूर शिवारातील बोरखेडी रोडवरील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेला कटांळून पुंजाजी जाधव यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. जाधव यांना दोन मुले व पत्नी असून घरातील कर्त्यापुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने जाधव कुटुंब उघड्यावर आले आहे. दोन्ही घटनेत मिळालेल्या तक्रारींवरून मेहकर पोलीस ठाण्यात कलम 174 अंतर्गत मर्ग दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - अश्लील वक्तव्यप्रकरणी बुलडाण्याच्या शिवसेना आमदारांविरुद्ध पोलिसात तक्रार