बुलडाणा - कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या दोन कोरोना योद्धा पोलीस शिपायांना बुलडाण्याच्या पोलीस कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. त्यांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी 8 जुलैला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते भेटवस्तू देत दोघांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरसिपी पथकांमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस शिपायांना मलकापूर येथील आपल्या घरी भेटून आल्यानंतर ताप-खोकला आल्यानंतर हे दोघेही बुलडाणा पोलिसांच्या कोविड केअर सेंटरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अॅडमिट करण्यात आले होते.
या दोघांचे तपासणी स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. आज दोघांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने दोघांना टाळ्या वाजवून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते सत्कार करुन कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पाटील यांनी दोन्ही शिपायांना गरम पाण्याचे थर्मास भेट म्हणून दिले. हे दोन्ही शिपाई आपल्या घरी चौदा दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. डिस्चार्ज देतेवेळी पोलीस उपअधीक्षक गीते, पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.