बुलडाणा - दोनशे रुपये जास्तीचा भाव देवून खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील कापूस उत्पादकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्याचा डाव शेतकऱ्यांनी मोडून काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे दोषी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगापूर गावातील शेतकरी कापूस घाणेगाव येथील गोपाल शित्रे व पिंपळगाव राजा येथील शब्बीर डॉन या दलालामार्फत कापूस विक्री करत होते, तर बाळापूर येथील व्यापारी यांनी शेतकऱ्यांचा कापूस मोजमाप करताना 1 क्विंटल मागे 40 किलो कापूस जास्त घेत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी गोधळ घातला. त्यामुळे मोजमाप करणारे तेथून पसार झाले आणि दलाल गोपाल शित्रे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेतकऱ्यांची याठिकाणी फसवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.
शेतकऱ्यांमुळे व्यापाऱ्यांचे बिंग फुटले -
व्यापाऱ्यानी सुरू असलेल्या भावापेक्षा प्रत्येकी क्विंटलमागे 200 रुपये जादा भाव देण्याचे आमिष देत गावातील शेतकऱ्यांकडील कापसाची मोजणी केली. मात्र, व्यापार्याच्या काट्यात काहीतरी गडबड असल्याचा संशय शेतकरी मोद कोल्हे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी व्यापारी व मापारीत हुज्जत घातल्याने शेतकरीही संतप्त झाले. कोल्हे यांनी यापूर्वीच आपला कापूस मोजला होता. त्यानंतर व्यापार्यानी मोजलेल्या वजनात तफावत आढळली. त्यामुळे व्यापाऱ्याचे बिंग फुटले. १०० किलोच्या मापात तब्बल ३० ते ४० किलोची फसवणूक होत असल्याचे दिसून आले. शेतकर्यांची झालेली फसवणूक निंदणीय असून व्यापार्यांच्या हमाल व मापारीला पोलीस स्थानकात आणल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. यावेळी कापूस व्यापारी पळून जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी कापसाच्या वाहनांची हवा देखील सोडली होती.