बुलडाणा - शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी बुलडाणा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी मार्फत केली आहे.
तालुका शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेतील शिक्षकामार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ नियुक्तीचे आदेश दिले आहेत. फौजदारी कारवाईची भीती दाखवून संबंधित कर्मचाऱ्याला ‘बीएलओ’च्या कामावर हजर होण्याची सक्ती केली जात आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही शिक्षक संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार (२००१) जनगणना व प्रत्यक्ष मतदान या दोन कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देण्यात येऊ नयेत, असे निर्देश आहेत. आणि न्यायालयाने सुध्दा असे निर्देश दिले आहेत. मात्र, याव्यतरिक्त कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे ‘बीएलओ’चे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. शिष्टमंडळात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष देवकर, राजेंद्र वाकोडे, गजानन सावळे, गौतम आराख, विजय राठोड, अब्दुल्ला खान, मोहम्मद रफीक अन्सारी निसार अहमद, सावळे, गजानन शेळके आदींचा समावेश होता.
हेही वाचा- 'मोदीच काय तर कोणाचीच शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही'