बुलडाणा - नांदुरा येथून जळगांवजामोदकडे भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणारी काळी पिवळी टॅक्सी झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली आहे. त्यामधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक ६ फेब्रवारीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान नांदुरा ते जळगाव रोडवर नवी ऐरळी जवळ घडली.
नांदुरा येथून प्रवाशांनी भरगच्च भरलेली काळी-पिवळी (क्रमांक MH 28/H 2678) टॅक्सी नवी येरळी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने कडूनिंबाच्या झाडावर आदळली. सदर अपघातात श्रीधर जगन्नाथ वेरूळकार (रा. येरळी), रामेश्वर पाटील (रा. येरळी), आकाश बावणे (रा. जळगांव), शोभाबाई नानाराव वाकोडे (रा.खेर्डा), रुख्मिणी तायडे (रा. खेर्डा) इत्यादी गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता भरती करण्यात आले. यामधील गंभीर जखमींना खामगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यावेळी 108 चे डॉक्टर शेख, ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे , चालक गणेश वनारे यांनी मदतकार्य केले.