बुलडाणा - केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे गेल्या 12 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. कृषी सुधारणा कायदे मागे घ्या, शेतमालाला किमान आधारभूत मूल्य लागू असलेला कायदा करा, आदी रास्त मागण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. याविषयी देशस्तरावरील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
केंद्र सरकार व शेतकरी संघटनासोबतची बैठक अनेकवेळा निष्फळ ठरली आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी गंभीर नाही, ही बाब विचारात घेऊन देशातील सर्व शेतकरी संघटनांनी आज (8 डिसेंबर) भारत बंदचे आवाहन केले आहे. या भारत बंदला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये प्रतिसाद मिळाला आहे.
मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांकडून अहमदाबाद-सुफा एक्स्प्रेस रेल्वे अडवण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राजकीय नाही, तर बळीराजाचा बंद -
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातूनही भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आज बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात सत्तेत असलेला पक्ष बंदमध्ये सहभागी असल्याने बंद कडकडीत होण्याची शक्यता आहे. हा राजकीय बंद नाही, जनतेने स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.