बुलडाणा - गेली दोन वर्षापासून देशात कोरोना साथीने थैमान घातले आहे. यामध्ये मोठ्या उद्योग व्यवसायांसह शेतऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक-पाणी नसल्याने अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कोरोना साथीत अणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पावसाने पाठ फिलवल्याने दुबार पेरणीवरून आता तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या सगळ्या आर्थिक संकटाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या कारखेड येथील शेषराव मंजुळकार (वय 60) आणि जनाबाई मंजुळकार (वय 51) अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेने बुलडाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका पाठोपाठ झाला मृत्यू
शेतकरी शेषराव मंजुळकार यांची पत्नी जनाबाई यांचा गुरुवारी ८ जुलैच्या रात्री ९ वाजता तर, शेतकरी शेषराव मंजुळकार यांचा आज शुक्रवारी ९ जुलैच्या सकाळी दोन वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या शेतकरी दाम्पत्याने बुधवारी ७ जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दुबार पेरणीनंतरही पाऊस नाही
चिखली तालुक्याच्या कारखेड येथील मंजुळकार दाम्पत्यांकडे दोन एकर शेती असून यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केलीय. मात्र, ते उगवले नाही. त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, मात्र ते उगवलेले असतांनाही पावसाअभावी पीक करपून गेले. आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. दोन्ही वेळा पेरणी केली, तर जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेत बुधवारी ७ जुलै रोजी दोघांनीही विष घेतले. त्यांना उपचारासाठी त्तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना दोघांचाही गुरुवारी मृत्यु झाला.
दगड फोडण्याचेही काम करायचे
मंजुळकार कुटुंबाकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले आहेत. तर, चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करण्याचेही काम करत होते. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायू आजार झालेला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते. यातच त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.