बुलडाणा - जिल्ह्यातून मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गासह अनेक राज्य मार्ग जातात. मात्र, रस्त्यांची झालेली अवस्था पाहता प्रशासनाला जागे करण्यासाठी खड्ड्याविना रस्ता दाखवा आणि 1 हजार रुपये मिळवा, अशी अजब घोषणा स्वाभिमानी संघटनचे जिल्हाध्यक्ष तथा अकोला संपर्क प्रमुख कैलास फाटे यांनी केली आहे. येत्या 8 दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास स्वाभिमानीकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयचं पडलं आजारी, घाणीच्या साम्राज्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष...
फाटे म्हणाले, सरकार रस्त्याच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तरीही रस्त्यांचे अच्छे दिन आलेले नाहीत. दररोज अपघातांची मालिका पाहायला मिळते. सर्व पक्ष खुर्चीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे कुणाचेच लक्ष नाही. आता स्वाभिमानी संघटना यासाठी मैदानात उतरली असून या सरकारला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आम्हाला भगतसिंगांचे रूप धारण करावे लागेल.