बुलडाणा- गावातील लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेची सुरुवात केली. त्यानुसार महाराष्ट्रातील आमदारांनी गावे दत्तक घेतली. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहकर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमूलकरांना त्यांचे दत्तक गाव कोणते हेच माहिती नाही. त्यांनी जे गाव निवडले होते ते सोडून त्यांनी भलत्याच गावाच्या विकासाची धुरा हाती घेतली. मात्र त्या गावात देखील ते विकासकामे करू शकले नाही.
मेहकर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील आमदार डॉ. संजय रायमूलकरांनी नेमके कोणते गाव आदर्श करण्यासाठी दत्तक घेतले, हा प्रश्न त्यांनाच पडला आहे. कारण रायमूलकरांनी मेहकर तालुक्यातील मोळा हे गाव दत्तक घेतले असून त्या ठिकाणी आपण विकास करू शकलो नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. रायमूलकरांनी याचे खापर कामचुकार अधिकाऱ्यांवर फोडले आहे. तर शासकीय दप्तरीत आमदार रायमूलकरांचे दत्तक गाव हे मोळा नसून लोणार तालुक्यातील जांभूळ आहे. त्या गावात शासकीय आकडेवारीनुसार आमदार आदर्श ग्राम योजनेतून फक्त १ लाख रुपयेच खर्च झाले आहे.
......इतकीच झाली विकास कामे
मेहकर मतदारसंघातील मोळा गावाची लोकसंख्या ही ३ हजार असून येथे १८०० मतदार आहे. येथे ९ ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या गावाला खूप महत्व देखील आहे. कारण, या गावाला मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमूलकरांनी आमदार आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले असल्याचे गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या गावाची परिस्थिती बघितली तर गावाला जोडणारा लोणी-गवळी ते जानेफळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. इतकेच नव्हे तर लावणा ते मोळा या रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे. समृद्धी महामार्ग बांधकामाकरिता लागणारे गौण खनिजे घेऊन जाणारे ट्रक याच रस्त्यावरून वाहतूक करीत असतात. ते या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त खनिजे घेऊण जात असल्याने या रस्त्याची ही दुरवस्था झाल्याचे सांगण्यात येते.
गावाची परिस्थिती बघितली तर गावाला समस्यांनी घेरले आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुविधा नाही. गावामध्ये नाल्या नाही, रस्ते नाही. विद्युत खांबावर लाईटची व्यवस्था नाही. घरकुले नाही आणि तीर्थ विकास क्षेत्र आराखड्यातील भक्त निवास अंदाजे १२ लाख समाज मंडप दिले गेले ते १० वर्षांपासून अर्धवट राहिलेले आहे. मोडा गावात जे काही कामे झाले आहे ते १४ वित्त आयोगातून झाल्याचे सरपंच सौ. सुनीता गजानन शेळके सांगतात. मोडी ते नायगाव दरम्यान ७ कि.मी रस्ता बांधकामासाठी मुख्यमंत्री सडक योजनेमधून २ कोटी देण्यात आले.
हेही वाचा- भाजपमुळे देश आर्थिक संकटात - सुजात आंबेडकर
दलित समाजाकरिता ७ लाख रुपयाचा सभामंडप मंजूर आहे. मात्र त्याचा उद्घाटनाकरिता आमदार रायमूलकर येणार होते. पण ते आले नाही. माझ्या दत्तक गावात विकास झाला नसल्याची कबुली आमदार रायमूलकरांनी दिली आहे. याचे खापर त्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर फोडले. मात्र, शासकीय दप्तरी मोळा हे गाव आमदार रायमूलकरांचे दत्तक गाव नसून लोणार तालुक्यातील जांभूळ हे गांव आमदार आदर्श ग्राम म्हणून त्यांनी दत्तक घेतले आहे. त्या गावात शासकीय आकडेवारीनुसार आमदार आदर्श ग्राम योजनेतून २८८.४८ लाखांच्या आराखड्यातून ३१ जुलै २०१९ पर्यंत फक्त १ लाख रुपये खर्च झाले आहे. आमदार रायमुलकरांनी चुकून ज्या गावाचा विकासाचा धुरा हाती घेतला, त्याची अवस्था आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे मुळात त्यांना जे गाव मिळाले होते त्याची गत काय असणार हे विचारायलाच नको.
हेही वाचा- जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; एअर लिकेजच्या पाण्यावर भागवतायेत तहान