बुलडाणा - जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी सी-1 वाघाचे आगमन झाले होते. परंतु 15 दिवस राहून हा वाघ पुढे अजिंठा पर्वत रांगेत गेला होता. अजिंठा लेण्यांपासून परतून हा वाघ पुन्हा एकदा ज्ञानगंगा अभयारण्यात आला आहे. मादी वाघिणीच्या शोधात तीन वर्षे वयाच्या या वाघाने तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास केला आहे.
अभयारण्यात आलेल्या 2 पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी हा सी-1 वाघ दिसला. वाघिणीच्या शोधात या वयात आलेल्या वाघाची पायपीट सुरू आहे. हा वाघ ज्ञानगंगेत अजून काही दिवस थांबल्यास त्याच्यासाठी मादीची सोय करण्यासाठीची पावले उचलण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - प्रजनन वाढीसाठी नागपूरचा 'सुलतान' मुंबईला रवाना
ज्ञानगंगा अभयारण्य 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या अभयारण्यात 3 वाघांसाठी सुरक्षित अधिवास ठरेल इतकी वनसंपदा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य ते ज्ञानगंगा अभयारण्य असे 1,300 किमीचे अंतर कापून हा सी-1 वाघ ज्ञानगंगेत आला होता. वाइल्ड लाइफ इन्सिट्यूटकडे या वाघाने केलेल्या प्रवासाच्या नोंदी आहेत.