बुलडाणा - सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या सैलानी बाबा अस्थाई समितीमधील वाद आणखी उफाळून समोर आला आहे. समितीच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या सयुक्त स्वाक्षरीनेच अर्थिक व्यवहार व्हावेत, असा ट्रिब्यूनल न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेने फक्त अध्यक्षांच्याच स्वाक्षरीने केलेल्या व्यवहारावर सैलानी बाबा अस्थाई समितीचे सचिव अब्दूल हमीद अब्दूल कदिर यांनी आक्षेप घेतला आहे.
अब्दूल हमीद यांनी सैलानी बाबा अस्थाई समितीचे अध्यक्ष, वक्फबोर्ड मुख्यकार्यकारी अधिकारी आणि सेंट्रल बँकेकडून ट्रिब्यूनलया न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचा आरोप केला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांचा प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्यावर देशाच्या काना-कोपऱ्यातून दर्शनासाठी लोक येतात. दरवर्षी होळीनंतर येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत लाखो भक्त दाखल होतात. यावर्षी 112 वी यात्रा असून 25 मार्च रोजी संदल निघणार आहे. या ठिकाणी दर्ग्याचे नियोजन वक्फ बोर्डअंतर्गत अस्थायी समितीकडून केले जाते. या अस्थाई समितीमध्ये एकूण 6 विश्वस्त आहेत. अस्थाई समितीचा कारभार नियमानुसार विश्वस्त यांना विश्वसात घेवून, सर्वांची संमती घेवून, ठराव घेवून चलविला पाहिजे. मात्र, अध्यक्ष विश्वस्त यांना विश्वसात न घेता दंबंगिरी करत मनमानी कारभार चलवतात, असा आरोप विश्वस्त करतात. दरम्यानच्या काळात सचिव अब्दुल हमीद यांना कोणतीही सूचना न देता वक्फबोर्ड मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सचिव पदावरून काढण्यात आले होते.
त्यावर सचिव अब्दुल हमीद यांनी वक्फबोर्डाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावर आक्षेप घेत ट्रिब्यूनल न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर ट्रब्यूनल न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 'जैसे थे' चे (स्टे) आदेश दिले. पूर्वीप्रमाणे अध्यक्ष आणि सचिव यांच्या स्वाक्षरीने बँकेत व्यवहार करावे, असा आदेश देत ट्रिब्यूनल न्यायालयात प्रकरण सुरू आहे, असे असतांना बुलडाणा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेने फक्त अध्यक्षांच्याच स्वाक्षरीने व्यवहार मंजूर करीत असल्याचा आरोप सचिव अब्दूल हमीद अब्दूल कदिर यांनी केला आहे.
याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांशी विचारले असता वक्फबोर्डच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्हाला विभागीय अकोला शाखेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी सांगितल्याने आम्ही व्यवहार सुरू केल्याचे बुलडाण्याचे व्यवस्थापक दिलीपकुमार सांगत आहे. ट्रिब्यूनल न्यायालयाचा आदेश मोठा, की वक्फबोर्डच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश मोठा, असे विचारल्यावर मला कायद्याबाबत माहिती नसल्याची प्रतिकिया दिलीपकुमार यांनी दिली. मात्र अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षरीने व्यवहार केल्याचे ट्रिब्यूनल न्यायालयाचे आदेश असतांना बँक प्रशासन फक्त अध्यक्षांच्या स्वाक्षरीने व्यवहार सुरू करणे एक प्रकारे न्यायालयाचा अपमान केल्याचा आरोप अब्दूल हमीद अब्दूल कदिर यांनी केला आहे. सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद शेख चाँद आणि सचिव अब्दूल हमीद अब्दूल कदिर या दोघांमध्ये वाद असून अध्यक्ष अब्दुल समद शेख चाँद यांच्याकडे 1 सदस्य आहे, तर सचिव अब्दूल हमीद अब्दूल कदिर यांच्याकडे 3 म्हणजे त्यांच्या सह 4 चे बहुमत आहे. अध्यक्ष अब्दुल समद शेख चाँद हे 1989 पासून अध्यक्ष पदावर विराजमान आहे.