बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली ओळखली जाते. चिखली विधानसभा मतदारसंघात ३ वेळा भाजपचा विजय वगळता काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते.
भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आले होते. यंदाही चिखली विधानसभेत भाजपकडून उमेदवारांची मोठी यादी असली तरी फारशी वेगळी परिस्थिती दिसत नाही.
चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांची संघाशी जवळीक असून, संघ बोन्द्रेंच्या विजयासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा सुरु आहे. चिखली विधानसभा निवडणुकीत मागील काळाचा विचार केला तर रेखाताई खेडेकर यांनी भाजपकडून 1999, 2013 आणि 2009 अशा ३ वेळा विजय संपादन केला आहे. या विजयात संघाचा कुठलाच प्रभाव नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र, नुकत्याच मिळालेल्या लोकसभेच्या अभुतपूर्व यशामुळे असंख्य नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, भाजपमध्ये साहजिकच उमेदवारी मिळविण्याची मोठी स्पर्धा आहे. हेच भाजपच्या पथ्यावर पडणार का? आणि त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मागील निवडणुकीचा इतिहास. जर यावेळच्या निवडणुकीचा विचार केला तर चिखली विधानसभा मतदारसंघात अफवांचे बाजार वाढलेले आहेत. सोशल मिडियामध्ये वाढलेली चर्चेमुळे या मतदारसंघातील मतदार संभ्रमात आहेत.
काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे हे शिवसेना किंवा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बोन्द्रे हे भाजपमध्ये प्रवेश करून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल बोन्द्रे यांना भाजपमध्ये प्रवेश न देता भाजपने निष्ठावंताना उमेदवारी द्यावी अशी मागणी इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले यांनी केली. महाले गटाने या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बैठा सत्याग्रह आंदोलनही केले.
काँग्रेसच्या गोटात आमदार राहुल बोन्द्रे यांची प्रीतिमा मालिन झाली असल्याचे बोलले जात आहे. तर अशा परीस्थित चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून गेल्या दोन वेळेस विजय संपादन करणाऱ्या आमदार राहुल बोंद्रे यांची उमेदवारी तळ्यात-मळ्यात समजली जात आहे. तर दुसरीकडे भाजपातील इच्छुकांमधील रस्सीखेच असल्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया पक्षश्रेष्ठींकरिता डोकेदुखीची ठरणार आहे. चिखली मतदारसंघात विविध विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी जातीय समीकरणांभोवतीच ही निवडणूक लढविली गेली नाही तरच नवल.
मतदारसंघातील समस्या
चिखली विधानसभा मतदारसंघात विकासात्मक मुद्यांवर बोलायचं झालं तर अनेक समस्या अजूनही कायम आहेत. त्यात प्रामुख्याने १ लाख लोकसंख्या असलेल्या चिखली शहरातील पाण्याचा प्रश्न कायम आहे. ही समस्या जरी नगरपालिका हद्दीतील असली तरीही लोकप्रतिनिधी या नात्याने महत्वाची ठरते. चिखलीत 1992 ला एमआयडीसीची स्थापना झाली. या ठिकाणी गोडाऊन वगळता एकही मोठा उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. शहरात अंतर्गत रस्ते नाहीत. चिखली हे धान्याचे मोठे बाजारकेंद्र होते. दळणवळणाचे मोठे साधन नाही. रेल्वे नसल्याने येथील बाजारपेठ बंद पडल्यासारख्या अवस्थेत आहे. सोबतच उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अजूनही प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न कायम आहे.
गेल्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकावर राहिलेले भाजपचे सुरेश खबुतरेसुद्धा यावेळी इच्छुक आहेत. तर इच्छुकांच्या रांगेत असलेले संजय चेके पाटील, अॅड. विजय कोठारी, पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविणारे नगराध्यक्ष पती कुणाल बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले यांच्यासह भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालविले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडूनसुद्धा काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सहसंपर्क प्रमुख असलेले भास्करराव मोरे विधानसभा लढविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष फक्त आमदारकीसाठी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत व्हाया भाजपमध्ये आलेले धृपदराव सावळे हे सुद्धा बुलडाणा किंवा चिखलीतून उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत. तसेच वंचित आघाडी यांच्याकडून देण्यात येणारा चेहरा काय वेगळा चमत्कार घडवून आणतील हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
2009 च्या निवडणुकीत आमदार राहुल बोंद्रेंनी 76 हजार 465 मतं घेऊन भाजपच्या प्रकाशबुवा जवंजाळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेतसुद्धा 61 हजार 581 मते घेत राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या सुरेश खबुतरे यांचा पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतावराव जाधव यांना चिखली विधानसभेत 23 हजारांच्यावर लीड मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल बोंद्रे यांचा विजय रथ थांबणार का? भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे आमदार राहुल बोंद्रे यांच्या विजयाची हॅटट्रिक सुकर होईल का? यंदा मोदी लाटेचा प्रभाव कामी येईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.