बुलडाणा - गजानन महाराजांनी हयात असताना सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सवाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाले. यानिमिताने शेगावात ६ एप्रिलपासून सुरू असलेल्या श्रीरामनवमी उत्सवाची आज सांगता करण्यात आली. यावेळी संपूर्ण शेगाव राममय झाले होते. या उत्सवात शेकडो भजनी दिंड्यांसह लाखो भक्तांनी सहभाग घेतला.
संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा...
संत गजानन महाराज मंदिरात श्रीरामनवमी उत्सव ६ एप्रिलपासून सुरू झाला होता. या उत्सवात श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागाची संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुर्णाहुती झाली. श्रीराम जन्मानिमित्त सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास किर्तन झाले.
१२ वाजता सनई चौघडा हरिनाम, टाळ्यांचा ध्वनी, गुलाबपुष्पाची उधळण करीत १२५ वा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरासमोर रजत पाळण्यात श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला. दुपारी २ वाजता श्रींचा पालखी सोहळा संतनगरीच्या परिक्रमेसाठी निघाला. या पालखी सोहळ्यात रथावर श्रीरामांची भव्य प्रतिमा होती. प्रारंभी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा केली. त्यानंतर श्रींच्या पालखीचे रथ, मेणा आणि गज अश्वासह नगर परिक्रमेस प्रस्थान झाले. नाम विठोबाचे घ्यावे पाऊल-पुढे पुढे टाकावे, असा अमृतमय अभंग गात वारकरीसह श्रींची पालखी प्रतिवर्षी ठरलेल्या मागार्ने नगर परिक्रमेसाठी निघाली. जुने महादेव मंदिर, श्रींचे प्रगटस्थळ व मारोती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
श्री रामनवमी उत्सव निमित्याने आज शनिवारी संतनगरी शेगावात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. शहरात दाखल झालेल्या हजारो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने चौकाचौकात बंदोबस्त लावला होता. यावेळी संस्थानच्यावतीने लाखोंच्यावर भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.