बुलडाणा - खामगाव येथील डीपी रोडवरील राघव संकुलात तीन व चार क्रमांकाच्या गाळ्यांमध्ये अवैध गुटखा दडवून ठेवलेला होता. या साठवलेल्या प्रतिबंधीत गुटख्यावर बुधवारी मध्यरात्री अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी छापा मारला. यावेळी 35 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
आरोपीवर गुन्हा दाखल -
राज्यात गुटखा, मावा, पानमसाला व तत्सम तंबाखुजन्य पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री यावर प्रतिबंध घातलेला आहे. राज्याचे अन्न औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन सातत्याने अवैध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत आहेत. खामगाव येथील अजय सिध्दार्थ खंडारे यांच्या डीपी रोडवरील राघव संकुलातील तीन व चार क्रमांकाच्या गाळ्यावर बुधवारी रात्री छापा मारण्यात आला. 35 लाख रुपयांचा गुटखा जप्त करून अजय सिध्दार्थ खंडारे याच्याविरुध्द अन्न सुरक्षा मानद कायद्यान्वये खामगाव शहर पोलीस
ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त -
चार दिवसांपूर्वीच(१८ जानेवारी) राजस्थानहून नाशिककडे दोन कंटेनर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार शनिवारी रात्री करंजखेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी 2 कंटेनर ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता प्रतिबंधित गुटखा पोलिसांना सापडला. महेंद्रसिंह सोलंकी, श्यामसिंह राव, अर्जुनसिंह राणावत आणि लोगलजी मेहवाल (रा. राजस्थान) या चौघांना वणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 कोटी 24 लाख रुपयांचा गुटख्यासह एकूण 1 कोटी 64 लाख 34 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.