बुलडाणा- नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करण्यात यावा यासाठी भारतीय मुस्लीम परिषद यांच्या नेतृत्वात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी जमीअत उलमा ए हिंद, जमात ए इस्लामी, महामानव ग्रुप संघटना, आजाद हिंद या संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडकलेल्या या आक्रोश मोर्चात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते.
हेही वाचा- डाटा लीक झाल्याचा गुगलपाठोपाठ ट्विटरचा भारतीयांना इशारा
केंद्र सरकाराने नागरिकत्व संशोधन कायदा अंमलात आणला. मात्र, हा कायदा फक्त मुस्लीम समाजाला निशाणा करण्यासाठी आणला असल्याचा आरोप करीत आज (शनिवारी) भारतीय मुस्लीम परिषदच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी या मोर्चाची इदगाह मैदानावरुन सुरुवात करण्यात आली. मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, जनता चौक, कारंजा चौक येथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.
मोर्चात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व विविध मागण्याचे फलके हातात धरलेले होते. शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून मागणीचे निवेदन दिले. केंद्र सरकारचा नागरिकत्व संशोधन कायदा कायद्याला धरून नाही. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, असे त्या निवेदनात सांगण्यात आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे स्वत: हजर होते. निवेदन देतेवेळी शिष्ठमंडळात जमात इस्लामीचे जिल्हाध्यक्ष डॉ. यासीन,जमीअत उलेमाचे जिल्हाध्यक्ष हाफिज़ शेख, खलील उल्लाह, अब्दुल हफीज़ खान, हाफिज़ रहमत खान, विजयराज शिंदे, मो.सज्जाद, अॅड. जयश्रीताई शेळके, अॅड. शरदचंद्र रोठे उपस्थित होते.