बुलडाणा - छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांना भेटणे काही गैर नाही. भाजपची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण पाठबळ देणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका भाजपची आहे. संजय राऊतांना उठलं की दुसरे कोणतेच काम नाही, सकाळी उठल्यानंतर केंद्र सरकारच्या नावानं शिमगा करायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने शिमगा करायचा, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचे काम त्यांचे आहे. आपलं अपयश आणि अकार्यक्षमता कशी लपवायची हे त्यांच्याकडून शिकावं, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
आरक्षणाच्या संदर्भात हुकमी एक्का नरेंद्र मोदी आहेत हे त्यांनी सांगायची गरज नाही. आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करू, परंतु आपल्या संविधानामध्ये एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेत आपल्याला काम करावं लागतं, परंतु लोकांना गुमराह करण्यासाठी वेगवेगळे फंडे राज्य सरकारच्यावतीने उपयोगात आणले जात असल्याचे सांगत भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा बुलडाण्याच्या धाड येथे समाचार घेतला.
ते दिवंगत दयासागर महाले स्मृतिप्रीत्यर्थ आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून बुलडाण्याच्या धाड येथे सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या प्रशस्त वास्तूमध्ये 50 बेडसचे आधार कोविड केअर सेंटरचे उद्घाटनासाठी आज शनिवारी 29 में रोजी आले होते. उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्यासोबत आमदार श्वेता महाले, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
या कोविड केअर सेंटर 50 बेड सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी असणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय नियमांप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. उपचारासाठी लागणारी औषधे, तपासण्या, नाष्टा, जेवणसुद्धा मोफत देण्यात येणार आहे.
हेही वाचा - आरक्षण देण्यात कोण कमी पडले, याची संभाजीराजेंना पूर्ण कल्पना- भाजप नेते गिरीश महाजन
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून जाणीवपूर्वक आरक्षण कसं जाईल यासाठी राज्य सरकारने काळजी घेतली असा गंभीर आरोपही दरेकर यांनी लावला.तर भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण पाठबळ देणार आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका भाजपची आहे. असे ते म्हणाले.
खासदार संजय राऊतांनी केलेले वक्तव्य -
छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्रातील एक सन्माननिय नेते आहेत. त्यांची भूमिका आणि संताप सरकारने समजून घेणे गरजेचे आहे. सरकार समजून घेत आहे. ते सर्व नेत्यांना भेटले आहेत. परंतु सर्वात प्रमुख भेट ही नरेंद्र मोदींची असली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता राज्याच्या हातात राहीलेला नाही. आम्ही सगळे छत्रपती संभाजीराजे यांच्या मतांशी सहमत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये हुकुमाचे पान आहे, त्यांनी ती टाकावी आणि निर्णय घ्यावा, असे संजय राऊत म्हणाले.
कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी-
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे असा घणाघाती आरोप करून ग्रामीण भागात मध्ये कोरोणाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाच्या परिस्थिती ज्या पद्धतीने हातडायची होती.त्या प्रकारे हातडायला गेली नाही.गरज भासेल तेव्हा विहीर खोडल्याचा प्रकार झाला आहे. ज्या ठिकाणी धोका जास्त असतो त्या ठिकाणी यंत्रणा वाढवावी लागते मात्र दुर्दैवाने सरकार तशी व्यवस्था उभी करू शकत नाही.ही व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम ग्रामीण स्तरावर तयार होणारे कोविड केअर सेंटर देत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक खाजगी कोविड रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे सेंटर द्या -
राज्यात ज्या खाजगी कोविड रुग्णालय आहे. त्या ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा सेंटर देण्याची मागणी आ.श्वेताताई महाले यांची राज्य सरकारला केली.कारण कोविड उपचारासाठी आणि म्युकरमायक्रोसिससाठी लागणारे खर्च लागणार नाही.आणि प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे सेंटर ठेवण्याचे मागणी लावून धरू असे प्रवीण दरेकरांनी ग्वाही दिली.
हेही वाचा - झारखंडच्या हजारीबागमध्ये फरशीवर उकळतंय पाणी!