बुलडाणा - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याती यावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी दुपारी जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करून शेकडो कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन वर्षे कमी पर्जन्यमानामुळे पिके हातची गेली. काढलेल्या पिक विम्याचा लाभातही विमा कंपन्यांनी हात मारला. शासनाने दुष्काळी अनुदानाची घोषणा केली. मात्र, ती हवेतच विरली. परिणामी, आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आर्थिक विवंचणेत सापडल्याने पुन्हा शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु होण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या -
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी, पेरणी ते कापणी पर्यंतच्या कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, ओबीसीच्या स्वतंत्र घरकुल योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करण्यात यावे, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क जमीन पट्टे त्वरित वाटप करण्यात यावेत, कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, वाळलेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्यात यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.