बुलडाणा - जिल्ह्यातील लोणार शहरातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 32 आरोपींना अटक केली आहे. तर एक आराेपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. यावेळी आरोपींच्या ताब्यातून २ लाख ४५ हजार २२५ रुपये, २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाइल, ३ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी व 20 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण २८ लाख ८४ हजार ५७९ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगाऱ्यांंमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोणार शहरातील रहिवासी राजू माधवराव मापारी यांच्या राहत्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने धाड टाकली असता घरातील तीन खोल्यामध्ये जुगार सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणारे आरोपी संतोष मदनलाल लद्धड (वय ४९, रा. हिवरा आश्रम), अनिल अण्णाभाऊ इंगळे (वय ३०, रा. शिक्षक कॉलनी मेहकर), सुधीर सुदाम गवई (वय ४१, रा. गजानन नगर चिखली), एकनाथ रामचंद्र गायकवाड (वय ३६, रा. ब्राम्हण चिकना), सुनील जयराम सूर्जन (वय ४२, रा. संतोषी मातानगर मेहकर), शेख सखावत शेख शफा (वय ४३, रा. नवी नगरी लोणार), सेख मिस्कीन शेख मुस्लीम (वय ४०, रा. कुरेशी मोहल्ला लोणार), फारुख खा रेबर खा पठाण (वय ३० रा. बर्डे प्लॉट खामगाव) यांच्यासह एकूण 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील राजू माधवराव मापारी (रा. लोणार) हा आरोपी फरार झाला आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून २ लाख ४५ हजार २२५ रुपये, २ लाख ६९ हजार २०० रुपये किंमतीचे पंचविस मोबाइल, ३ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी, 20 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण २८ लाख ८४ हजार ५७९ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- ५ मोटरसायकलसह दोन आरोपी ताब्यात, बारामती तालुका गुन्हे शोध पथकाची कामगिरी