बुलडाणा - शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविली जाणारी वऱ्हाडातील सुमारे शेकडो वर्षांपासूनची जुनी परंपरा असलेली अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी बुलडाण्यातील भेंडवळ येथील घटमांडणी यावर्षी राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने मांडणीचे भाकीत मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये जाहीर केली जाणार आहे. तर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडवळ येथे घटमांडणीकरिता येऊ नये, असे आवाहन चंद्रभान महाराजांचे वंशज शिवाजी पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी केले आहे.
देशातील सर्वच विषयावर होते भविष्यवाणी
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपूर्वी येथील वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात. पिढ्यांपिढ्यापासून हे भाकीत खरे ठरत असल्याचा दावा शेतकरी करीत असल्याने या मांडणी व भाकितावर जनतेने विश्वास ठेवला आहे.
यावर्षी १५ तारखेला होणार मांडणीचे भाकीत
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत ऐकण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावर्षी अक्षयतृतीयेच्या दिवशी म्हणजेच १४ मे रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत १५ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून शेतकरी व नागरिक येत असल्याने मोठी गर्दी होते. मात्र जिल्ह्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा जाहीर कार्यक्रम यावर्षी मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये केला जाणार आहे. प्रसारमाध्यमांद्वारे भेंडवळ घटमांडणीचे भाकीत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडवळ येथे घटमांडणीकरिता येऊ नये, असे आवाहन पुंजाजी महाराज वाघ, सारंगधर महाराज वाघ यांनी केले.
'चोरून घट मांडणीचे भाकीत वर्तविले होते'
कोरोनाच्या प्राश्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी होणार नाही. असा निर्णय घेतल्यानंतरही सारंगधर महाराज वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी 27 एप्रिल रोजी चोरून घट मांडणीचे भाकीत वर्तविले होते. मागच्या वर्षी चारही महिन्यात पावसाळा सर्वसाधारण व चांगल्या स्वरुपात राहील,अतिवृष्टी सुद्धा होईल, महापूर येइल पृथ्वीवर नैसर्गिक व रोगराईचे संकट येइल त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल, राजा कायम आहे. मात्र आर्थिक स्थिति खालावल्यामुळे राजावर तनाव वाढेल तर पिकांसंदर्भात ज्वारी, तूर, गहू कपाशी, सोयाबीन सर्व पीक चांगले येतील. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केल्या जाइल, चारा टंचाई भासेल असा अंदाज वर्तविला गेला होता. रोगराई येण्याच्या इशाऱ्यासह नैसर्गिक किंवा कुत्रीम आपत्ती येण्याबाबत या भाकीतमध्ये वर्तविले गेले होते.
अशी केली जाते घटमाडणी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमाडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते व काही खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय समयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेतीविषयक, राजकारण, नैसर्गिक भविष्यवाणी, पाणी पाऊस आणि पीक पाणी कसे राहील, याबाबत अंदाज वर्तविले जातात. शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय्य तृतीयेला भेंडवळला येत असतात व भाकीतला ऐकून त्यावरुन शेतकरी वर्षभरातील शेतीचे नियोजन करतात.
हेही वाचा - एकेकाळचा सालगडी आज ठरत आहे सातशे जणांचा अन्नदाता