बुलडाणा - मोदी सरकारची सुरुवात अब की बार मोदी सरकारपासून ते चौकीदार चोर है पर्यंत झाली आहे. सरकारने सुरू केलेली पंतप्रधान उज्जवला योजना म्हणजे जुमला असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्या बुलडाण्यात बोलत होत्या. यावेळी मतदारांना आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिगणे यांना विजयी करण्याचे आवाह करत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत देऊ नका, असेही वाघ म्हणाल्या.
आघाडीचे उमेदवार डॉ. शिगणेंच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांनी बुलडाणा शहरातील विविध भागात प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांनी नागरिकांना डॉ. शिगणेंना निवडणून आणण्यासाठी आवाहन केले. तर मुस्लीम बहूल भागातील महिलांच्या बैठकी घेवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला का मत देऊ नये, हे पटवून सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत दिले तर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी हातभार लागेल, असेही मुस्लीम महिलांना वाघ यांनी समजून सांगितले.
गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक आश्वासने सरकारने दिली आहेत. दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. मात्र ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत. उलट महागाई भरमसाठ वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यांच्या मालाला भाव नाही, उज्वला योजनेच्या नावाखाली देशाच्या आणि राज्याच्या महिलांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. कनेक्शन मोफत, अशी घोषणा शासनाने केली, मात्र कनेक्शनवर अन्न शिजत नाही. त्यासाठी सिलेंडर लागतो आणि सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
महिलांची सुरक्षा हा अतिशय ऐरणीवरचा प्रश्न आहे. एनसीआर रिपोर्ट आपण बघितला, तर गेल्या पाच वर्षात तीस टक्के क्राईम वाढलेला आहे. महिलांचे बलात्कार आणि त्यांच्या छळवणुकीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे मोदी सरकार बेटी बचावचा नारा देत आहेत. फक्त घोषणा देऊन बेटी वाचणार नाही, तर त्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कायदे बनले मात्र त्याची अंमलबजावणी नाही. यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासर्व बाबी आम्ही घराघरापर्यंत घेऊन जात आहोत. यासाठी आघाडीचे शासनच आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून देत आहोत, असेही वाघ यांनी यावेळी सांगितले.